यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघोदे गावाजवळच्या पुलावरून मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक पुलावरून खाली पडला. या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला आहे.
दिनांक ११ ऑगस्टच्या मध्यरात्रीत सुमारे २ वाजेच्या दरम्यान बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्गावरील वाघोदा गावा जवळील दुहेरी पुलावरून नागपुरहुन गुजरातकडे सोयाबीनचा भुसा भरून जाणारा ट्रक् (क्रमांक जिजे१२ एटी ७५५५) हा जात होता. त्याचवेळी समोरून चोपड्याहून खंडवाकडे कोबंड्यांनी भरलेला ट्रक क्रमांक ( एम.पी.१०, जि१२५०) हा आला. यावेळी चोपड्याहुन खंडवाकडे जाणाऱ्या ट्रकवरील चालक संतोष पिराजी शिंदे (रा.रामनगर खडंवा, मध्यप्रदेश) यांनी गुजरातकडे जाणाऱ्या ट्रकला कट मारला. त्यामुळे गुजरातकडे जाणाऱ्या ट्रकचा चालक सामतभाई कान्हाभाई कटेरिया (वय ३७ वर्ष रा. कडकांना कडुका, जिल्हा राजकोट, गुजरात) यांचा अचानक ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रकचालक सामतभाई समोरून येणाऱ्या वाहनास वाचविण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांचा ट्रक हा पुलावरून खाली कोसळला. या अपघातात ट्रकचालक सामतभाई यांचा जागीच मृत्यु झाला.
या अपघाताची माहीती मिळताच साकळी पोरटचे हवलदार अशोक जवरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अपघातात मरण पावलेला ट्रकचालकाचा मृतदेह वाघोदा ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या संदर्भात अद्याप गुन्हा दाखल झालेला असून अपघातास कारणीभुत ठरलेल्या ट्रकला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.