खासगी ट्रॅव्हल्‍स बसचा अपघात; एका जणाचा मृत्यू, १७ जण जखमी

गोंदिया-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हैदराबाद वरून मध्यप्रदेशातील लांजीकडे मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगाव तालुक्यातील मिलटोली गावाजवळ १० जुन रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एका मजूराचा मृत्यू झाला असून ११ जण गंभीर तर ६ जण किरकोळ जखमी झाले. थानसिंग यादव असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून ट्रॅव्हल्स चालक मोहित उमाप्रसाद किरसान यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मध्यप्रदेश राज्यातील लांजी येथून हैदराबाद करिता खासगी ट्रॅव्हल्स चालविण्यात येत असून दरदिवशी शेकडो प्रवासी या ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. दरम्यान, हैदराबाद येथे कंस्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी मध्यप्रदेश राज्यातील अनेक मजुरांची हैदराबाद येथे ने-आण करण्यात येते. त्यातच आज सोमवारी सकाळी हैदराबाद वरून जवळपास ७० ते ८० प्रवाशांना घेऊन लांजी येथील पायल ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक एमपी १३ पी ७९९९ परत लांजीकडे जात असताना गोंदिया व गोरेगावच्या मध्ये राष्ट्रीय महामार्गावर मिलटोली परिसरात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. यावेळी, रस्त्याच्या कडेवरील राहुल राईस मिलच्या मजुरांच्या क्वार्टरला बस धडकली.

ज्यामध्ये ट्रॅव्हल्स मध्ये सवार असलेले १२ मजूर गंभीर जखमी झाले. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटना स्थळ गाठल आणि यावेळी, सर्व जखमींना गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात भर्ती करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरु असताना थानसिंग यादव याचा ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. तर ११ गंभीर प्रवाश्यांवर उपचार सुरु असून ६ किरकोळ जखमींना औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले.

हैदराबादहून लांजीला परत जात असलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचा नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेवरील राहुल राईस मिलमध्ये काम करणार्‍या मजुरांच्या क्वार्टरला धडकली. ज्यामध्ये संपूर्ण क्वार्टरची तुटातुट झाली. यावेळी, सुदैवाने सर्व मजूर क्वार्टरच्या बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला. गेल्या काही महिन्यांपासून लांजी ते हैदराबाद तीन ते चार ट्रॅव्हल्स चालविण्यात येत असून दरदिवशी सायंकाळी लांजी येथून तर हैदराबाद वरून दुपारी २ वाजता बस सोडण्यात येत असून रात्रभर प्रवास केला जातो. ज्यामध्ये अनेकदा चालकाला झोपेची झपकी येउन वाहनावरील नियंत्रण सुटते व अपघात घडतात. मात्र, या प्रकाराकडे वाहतूक पोलीस व परिवहन विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येते, तेव्हा या ट्रॅव्हल्सवर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न या अपघाताच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Protected Content