जामगावजवळ शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; दुचाकीस्वार जखमी

sharad pawar

नागपूर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आहेत. शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीने एका बाईकला धडक दिली. या अपघातात बाईकस्वार जखमी झाला. नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी येथून खापाकडे जात असताना जामगावजवळ हा अपघात झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाईकस्वाराला धडक देणारी बोलेरो ही गाडी ताफ्यात शरद पवार यांच्या वाहनाच्या 4 ते 5 वाहन मागे चालत होती. अचानक ब्रेक लागल्यामुळे ही दुर्घटना झाली असे सांगितले जात आहे. पवार यांच्या ताफ्यातील एम्बुलन्सने जखमी तरुणाला लगेच जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे.

ओल्या दुष्काळातलं शेतकऱ्यांचं दुःख कळावं, व्यथा सरकारपर्यंत पोहोचाव्या, म्हणून खामगांव येथील शेतकऱ्यांनी शरद पवार यांना शेतीतील वाळलेल्या पिकांचा बुके दिला. वाळलेले कपाशीचे बोंडं, आणि सडलेल्या संत्र्याचा बुके पवारांकडे देऊन शेतकऱ्यांनी यावेळी कर्जमाफीची मागणी केली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. 6 नोव्हेंबरला भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे यांना सुरक्षा देणार्‍या पोलीस वाहनाचा मोठा अपघात झाला होता. पारनेर तालुक्यातील गारखिंड घाटात गाडीला अपघात झाला होता. दुसरीकडे, 7 नोव्हेंबरला काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या गाडीला पुण्यात अपघात झाला. या अपघातातून विश्वजित कदम थोडक्यात बचावले. विश्वजीत कदम यांना अपघातात कोणतीही गंभीर इजा झाली नव्हती.

Protected Content