Accident : शतपावली करण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला स्कूलबसची धडक; पती ठार, पत्नी गंभीर जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहाटे शतपावली करण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला स्कूलबसने दिलेल्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

 

गफ्फार सुलेमान पिंजारी (वय-५४) रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून रईसाबी पिंजारी ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

 

याबाबत माहिती अशी की, गफ्फार पिंजारी हे पत्नी रईसाबी व मुलांसह सुप्रिम कॉलनीत वास्तव्याला आहे. दररोज ते राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पहाटे वाजता शतपावली करण्यासाठी जात असतात. नेहमीप्रमाणे सोमवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता गफ्फार पिंजारी व त्यांची पत्नी रईसाबी हे दोघे शतपावली करण्यासाठी निघाले. राष्ट्रीय महामार्गावरील नेक्सा शोरूम समोर पिंजारी दाम्पत्य पायी जात असतांना मागून (एमएच १९ डीवाय ९०३४) या क्रमांकाच्या टाटा मॅजीक स्कूलबसने जोरदार धडक दिली. या धडकेत गफ्फार पिंजारी हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी रईसाबी ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरीकांनी धाव घेतली. जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता गफ्फार पिंजारी यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयताच्या पश्चात चार मुले, दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी जाफर गफ्फार पिंजारी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content