नवी दिल्ली वृत्तसंस्था । लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती कायम आहे. सैनिक आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही सीमा वादावर कुठलाही ठोस तोडगा निघालेला नाही. दरम्यान सीमेजवळ चीनकडून रस्ता बांधणीचे काम वेगात सुरु आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांना पर्यायी मार्ग बांधण्यासाठी चीनकडून वेगात काम सुरु आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला कमी वेळात, जलदगतीने सैन्याची जमवाजमव करता येणार आहे. सॅटलाइट फोटोंनुसार, चीन पूर्व लडाखच्या उत्तर पूर्वेला नवीन रस्ता बांधत आहे.
पूर्व लडाखच्या भागांमधून जाणाऱ्या या रस्त्याचे बांधकाम १९५० च्या दशकात सुरु करण्यात आले होते. जे १९५७ मध्ये पूर्ण झाले. या रस्त्याचे बांधकाम भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण व्हायला कारण ठरले होते. अखेर त्याची परिणीती १९६२ सालच्या युद्धामध्ये झाली.
युद्धानंतर चीनने त्यावेळी नवीन रस्ता असलेल्या G219 च्या माध्यमातून पश्चिम क्षेत्रावर ताबा मिळवला होता. G219 येथे असलेले चिनी युद्ध स्मारक या क्षेत्रात भारतीय सैन्याने किती शौर्याने लढा दिला त्याची साक्ष देते.
५० च्या दशकातील रस्ता उभारणीच्या कामापासूनच नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांकडून होणाऱ्या रस्ता बांधणी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीच्या कामाकडे दोन्ही देश संशयाने पाहतात. चीनची नियत लक्षात घेऊन वेगाने सैन्य हालचाल करता यावी, यासाठी भारतही लडाख सीमेजवळ वेगाने रस्ता बांधणीसह इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचे काम वेगात करत आहे.