मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मालमत्तेवर नाव लावण्यासाठी लाचेची मागणी करणारा तालुक्यातील राजूरा येथील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचा शिपाई या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, राजूरा येथील एका व्यक्तीची मालमत्ता ही त्याच्या आईच्या नावावर होती. या मालमत्तेवर नाव लावण्यासाठी ग्रामसेवक मनोज सुर्यकांत घोडके आणि ग्रामपंचायतीचा शिपाई सचिन अशोक भोलाणकर यांनी ११ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात त्यांनी जळगाव येथील अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला.
दरम्यान, ग्रामसेवक मनोज सुर्यकांत घोडके आणि ग्रामपंचायतीचा शिपाई सचिन अशोक भोलाणकर यांनी ठरलेल्या ११ हजार रूपयातील सहा हजार रूपयांची लाच स्वीकारली असता त्यांना तात्काळ एसीबीच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधिक्षक सुहास देशमुख, पोलीस निरिक्षक अमोल वालझडे, फौजदार दिनेशसिंग पाटील यांच्यासह बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, शैला धनगर, रवींद्र घुगे, सुरेश पाटील, किशोर महाजन, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी आणि सचिन चाटे यांच्या पथकाने केली.