जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाडेतत्वावर दिलेल्या रिक्षाचा अपघात झाल्यानंतर तिच्या शिवाजी नगर येथील चालकाला धमकावून त्याचे एटीएम कार्ड व इतर दस्तएवज घेऊन बँक खात्यातील रक्कम काढणे व नंतरही धमकावल्याची घटना घडली. याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात योगिता जितेंद्र ठाकूर (३४, रा. नवीन घरकूल, शिवाजीनगर) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या पतीला दीपककुमार गुप्ता (रा. शिवाजीनगर, हुडको) यांनी भाडेतत्वावर रिक्षा चालविण्यासाठी दिली होती. या रिक्षा व पतीचा अपघात झाल्यापासून रिक्षा चालविणे बंद होते. त्यामुळे रिक्षाच्या कर्जाचे हप्ते परतफेड करण्यासाठी गुप्ता यांनी ८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांच्या पतीला धमकावून एटीएम कार्ड व इतर दस्तएवज घेऊन त्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली व रोख रक्कमही घेतली. त्यानंतरही गुप्ता हे या महिलेकडे पैशाचा तगादा लावून धमकावत असे. तसेच पतीला मारहाण करून महिला व तिच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ करीत पैसे भरावेच लागतील, पैसे कसे वसूल करायचे ते मला चांगले माहित आहे, तुम्ही पैसे भरले नाही तर तुम्हाला परत जंगलात पाठवेल व तुमचे घर जप्त करेल, अशी धमकी देत असत, असे फिर्यादीत म्हटले आहे. दिलेल्या फिर्यादीवरून दिपककुमार गुप्ता यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित करीत आहेत.