मुंबई वृत्तसंस्था । मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना काही असामाजिक घटकांकडून प्रवासात छळवणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळाने’ एका खासगी संस्थेच्या मदतीने विरार ते डहाणू, नेरळ ते कर्जत या स्थानकादरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे नुकतेच सर्वेक्षण केले. यात पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू स्थानकादरम्यान ४५ टक्के महिलांनी प्रवासात छळवणूक होत असल्याचे सांगितले.
दरम्यान, दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ होत असून महिला प्रवाशांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विरार ते डहाणूपर्यंतच्या केलेल्या सर्वेक्षणात विरार, पालघर, वैतरणा स्थानकातून प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास हा उभ्यानेच होतो. त्यामुळे लोकलसाठी स्थानकांत होणाऱ्या गर्दीसोबतच काही असामाजिक घटकांकडून त्रास दिला जात असल्याच मत यातील अनेक महिलांनी व्यक्त केले. जवळपास 45 टक्के महिला विरार ते डहाणू दरम्यानच्या प्रवासात छळ आणि त्रास होत असल्याचे सांगतात. प्रवासात छळ होत असल्यामुळे यातील एक चर्तुथांश महिला रेल्वे पोलिसांत तक्रार करण्यासाठी पुढे येतात. काही महिला या सुरक्षा हेल्पलाईनची मदत घेऊन आपली समस्या सोडवतात. त्यातच या स्थानकादरम्यान महिला प्रवाशी रेल्वे स्थानकात प्रवेश करताना अनधिकृत खाद्यपदार्थ स्टॉल्स, फेरीवाले आणि मोठ्या प्रमाणात गर्दीचा सामना करत प्रवेश करावा लागतो, असेही काही महिलांनी सांगितले. याबाबत रेल्वे प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेता महिला सुरक्षा, महिला डब्यांमध्ये वाढ, डब्यात महिला पोलीस, सीसीटीव्ही कॅमेरा त्यासोबत महिलांना होणाऱ्या रोजच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केल्यास महिलांवरील अत्याचार थांबण्यास मदत करण्याची मागणी महिलांनी केली आहे.