अभ्यासक्रमानुसार पुस्तकांची निवड करा – प्रा. अंकुश देशमुख

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भुसावळ परिवर्तन मंच आयोजित मिशन एमपीएससी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प द युनिक अकॅडमी मधील मार्गदर्शक प्रा. अंकुश देशमुख यांनी गुंफले. प्रा. देशमुख यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांत महत्वाचा असणारा व बहुतेक विद्यार्थ्यांना कठीण जाणाऱ्या अर्थशास्त्र विषयावर मार्गदर्शन केले.

सुरुवातीला प्रा.अंकुश देशमुख यांनी विद्यार्थांनी सर्व प्रथम अभ्यासक्रम पहावा व त्यानुसार पुस्तके निवडावीत असा महत्वाचा सल्ला दिला. अर्थ व वाणिज्य घटकाचा अभ्यास सुरू करताना सर्व प्रथम अभ्यासक्रम लिहून काढावा व बालभारती आणि एनसीइआरटीचे नववी ते बारावीची अर्थशास्त्र विषयाची पुस्तके वाचावीत. ही मूलभूत पुस्तके विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना तयार करण्यास अत्यंत उपयोगी आहेत.

त्यानंतर रंजन कोळंबे, किरण देसले व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयावरील पुस्तके अभ्यासवित. सोबतीला स्पर्धा परीक्षांवर आधारित मासिके वाचावीत असा सल्ला दिला. अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करतांना संकल्पना समजून घेणे अत्यावश्यक आहे उगाच आकडेवारी पाठ करण्यावर अधिकचा वेळ खर्च करू नये. सरांनी लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षेत अर्थशास्त्र विषयावर किती गुणांचे प्रश्न येतात याबाबत माहिती दिली सोबतच या घटकात येणाऱ्या विविध संकल्पनांचा अभ्यास कसा करावा यावर भाष्य केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करतांना भारतीय अर्थव्यवस्थे सोबतच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुद्धा अभ्यासावी यावर लक्ष्य केंद्रित केले. सोबतच मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र विषयाकडे क्लिष्ट विषय म्हणून न पाहता सकारात्मकते पाहावे असा सल्ला दिला.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विनोद नन्नवरे यांनी अक्षर साक्षर होण्यासोबतच अर्थ साक्षर होणे सुद्धा गरजेचे आहे, असे प्रतिपादन करीत भुसावळ परिवर्तन मंचच्या पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या आभासी पद्धतीने झालेल्या व्याख्यानाचे प्रास्ताविक व सूत्र संचलन मंच सदस्य डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले तर आभार डॉ. सचिन कुंभार यांनी मानले सोबतच तांत्रिक बाजू भुसावळ परिवर्तन मंचाच्या सोशल मीडिया प्रमुख प्रा. सुचित्रा लोंढे यांनी सांभाळली. भूगोल या विषयावरील द युनिक अकॅडमीच्या प्रा. प्रीती तारकस-जडिये यांचे व्याख्यान गुरुवार दि. 14 रोजी सायंकाळी सहा वाजता होईल.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंच सदस्य नरविरसिंग रावळ, ॲड जस्वंदी भंडारी, ॲड. दिनेश चव्हाण, राजेंद्र जावळे, मंगेश भावे, अक्षय ठाकूर, आशुतोष माळी, इत्यादींनी सहकार्य केले.

Protected Content