नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावणारे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचा भारतीय हवाईदलाचे प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी ५१ स्क्वाड्रनचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारी या दिवशी पाकिस्तानचे एफ-१६ हे लढावू विमान पाडल्यानंतर ५१ स्क्वाड्रनला प्रशस्तीपत्र देण्यात आले. कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन सतीश पवार हे ५१ क्वाड्रनचा हा सन्मान स्वीकारणार आहेत. या व्यतिरिक्त बालाकोट एअरस्ट्राइक यशस्वीपणे राबवणाऱ्या ९ क्वाड्रनचा देखील विशेष सन्मान करण्यात येणार आहे. याच क्वाड्रनच्या मिराज २००० या लढावू विमानांनी ‘ऑपरेशन बंदर’ यशस्वी केले होते. ९ क्वाड्रनला देखील यूनिट प्रशस्तीपत्र देण्यात आले होते. बालाकोट एअरस्ट्राइक आणि पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना परतवून लावणारी क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवालच्या ६०२ सिग्नल यूनिटचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.
पुलवामा येथे १४ फेब्रुवारी या दिवशी मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. याच भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने बालाकोट हवाई हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. अभिनंदन यांनी पाकिस्तानचे लढावू विमान खाली पाडले. याच दरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचे लढावू विमानही कोसळले होते. यानंतर संपूर्ण देशभरातून अभिनंदन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचे लढावू विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळल्यानंतर पाकमध्ये त्यांना कैद करण्यात आले. त्यांच्या सुटकेसाठी भारताने मोठे प्रयत्न केले. अभिनंदन यांना पाकिस्तानने दोन दिवस कैदेत ठेवले होते. भारताच्या प्रयत्नांनंतर १ मार्च या दिवशी पाकिस्तान सरकारने अभिनंदन वर्तमान यांची सुटका केली. २७ फेब्रुवारी या दिवशी अभिनंदन यांनी केलेल्या कामगिरीचा सन्मान करत भारत सरकारने त्यांना वीर चक्र जाहीर करत त्यांचा सन्मान केला. परमवीर चक्र, महावीर चक्र यांनंतर वीर चक्र हा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार समजला जातो. आज विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या क्वाड्रनचा वायुदलातर्फे विशेष सन्मान करण्यात आला.