दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावरील संकटे कमी व्हायला तयार नाहीत. कथित मद्य घोटाळ्यात पक्षाच्या मागे चौकशीचा ससेमिरी सुरू असताना व मुख्यमंत्री केजरीवाल स्वत: तुरुंगात असताना आता आमदार अमानतुल्ला खान यांना अटक झाली आहे.
ईडीने आज २ सप्टेंबर रोजी खान यांना राहत्या घरातून अटक केली. वक्प बोर्ड घोटाळ्याच्या प्रकरणात ही अटक झाल्याचं सांगितलं जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी अमानतुल्लाह खान यांच्या घरावर छापा टाकून त्याची सहा तास चौकशी केली व त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.
१०० कोटी रुपयांची वक्फ प्रॉपर्टी बेकायदेशीररित्या भाडेतत्त्वावर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. खान यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली वक्फ बोर्डावर ३२ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा ही आरोप आहे. या प्रकरणी चार आरोपी आणि एका कंपनीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.