मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत आज शिवसेना भवनात दुपारी चार वाजता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार असून यात ते नेमके कोणते आरोप करतात ? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज आपण चार वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे. याआधी राऊतांनी १५ फेब्रुवारीला शिवसेना भवनात दुपारी चार वाजताच पत्रकार परिषद घेत भाजपसह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते. संजय राऊत यांच्या त्या पत्रकार परिषदेत त्यांचं मुख्य टार्गेट हे भाजप नेते किरीट सोमय्या होते. त्यामुळं आज कोण त्यांच्या निशाण्यावर असणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं छापा टाकला होता. हा छापा जवळपास चार दिवस सुरु होता. त्यामुळं केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कारवायांवर संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात याची उत्सुकता लागली आहे.