शेतकऱ्यांच्या थकबाकीसाठी आ. मंगेश चव्हाण आक्रमक

चाळीसगाव, प्रतिनिधी । रावळगाव कारखान्याने उसाची देयके थकविलेल्या चाळीसगाव तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांची बैठक चाळीसगाव येथे आ. मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे जतन केलेला उस मोठ्या विश्वासाने तुमच्या कारखान्याला दिला, कारखाना फायद्यात चालवायचा की तोट्यात ही सर्वस्वी कारखाना मालक म्हणून तुमची जबाबदारी होती. कारखाना तोट्यात असेल तर त्यात शेतकऱ्यांची चुकी नाही. तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात. तुमच्या कुटुंबाचे शेतकऱ्यांसाठी योगदान कुणी नाकारत नाही. काल तुम्हाला भेटलो, हात जोडून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या, उद्या गरज पडली तर तुमचे पाय पडेल पण शेतकऱ्यांना नाडण्याचे पाप होऊ देऊ नका, करोडोंची कष्टाची कमाई तुमच्याकडे थकल्याने आज शेतकरी उध्वस्त झाला आहे. पैसे नसल्याने सावकाराकडून कर्ज काढून शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली, अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमुळे मुलींची लग्ने थांबवावी लागली. मी शेतकऱ्याचा प्रश्नांसाठी जेल भोगून आलेला आमदार आहे, शेतकऱ्यांसाठी कुठलीही किंमत मोजायला मी तयार असतो म्हणून शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता आपल्या पक्षातील शेतकरी नावाला व आम्हाला भेटीत १५ दिवसात पेमेंट करतो या शब्दाला जागा अन्यथा आम्ही सर्व शेतकरी अलिबागला येऊन घेराव घालू असा इशारा चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी रावळगाव येथील एस.जे.शुगर्स कारखान्याचे मालक व शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते आमदार भाई जयंत पाटील यांना दिला. रावळगाव कारखान्याने उसाची देयके थकविलेल्या चाळीसगाव तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांची बैठक चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
सदर बैठकीला मंचावर जेष्ठ नेते उद्धवराव माळी, माजी जिप सदस्य शेषराव बापू पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल निकम सर, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, माजी मार्केट कमिटी सभापती मच्छिंद्र भाऊ राठोड, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राठोड, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, माजी पंचायत समिती सभापती दिनेश बोरसे, माजी कृषी अधिकारी व्ही डी पाटील, ऊस उत्पादक शेतकरी किसनराव देशमुख, बापूराव पाटील, डॉ. महेंद्रसिंग राठोड, आबा पोलीस, शांताराम आबा, हरिभाऊ काळे सायगाव तसेच सायगाव माळशेवगे बाळ काकळणे, वडगाव, देशमुखवाडी, टाकळी पिलखोड, नांद्रे, पिंपळवाड निकुंभ, तळोदा प्रदे, अलवाडी, तमगव्हाण व चाळीसगाव तालुक्यासह भडगाव, नांदगाव, कन्नड, वैजापूर तालुक्यातील जवळपास ३०० उस उत्पादक शेतकरी, मुकादम यांची उपस्थिती होती.
शेतकरी व मुकादम यांचे म्हणणे एकूण घेतल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी बैठकीमागील आपली भूमिका मांडली. गेल्या ५ महिन्यांपासून शेतकऱ्यांची जवळपास १५ कोटींची देयके थकीत आहेत. याबाबत मला अनेकदा राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी यांनी माहिती दिली. मीदेखील साखर आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला. कारखान्याचे मालक आमदार भाई जयंत पाटील यांची अनेकदा भेटीसाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही म्हणून त्यांच्या अलिबाग येथील निवासस्थानी जाऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली तेव्हा जयंत पाटील यांनी १५ दिवसात थकीत देयके देण्याचे आश्वासन दिले. मात्र शेतकऱ्यांची कुठलीही दिशाभूल होऊ नये यासाठी उद्या जर दुर्दैवाने रावळगाव कारखान्याने थकीत देयके देण्यास पुन्हा टाळाटाळ केल्यास पुढील दिशा काय असावी यासाठी विचारविनिमय करण्यासाठी, शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. तसेच आंदोलनाच्या माध्यमातून कारखान्यावर दबाव निर्माण करण्यासोबतच विधानसभा सदस्य या नात्याने विधिमंडळात, न्यायालयात शेतकऱ्यांच्या वतीने लढा सुरु ठेवेल असेही त्यांनी सांगितले.

कारखान्याने ऊसबिल थकवले, शेतकऱ्यांना कर्ज फेडता न आल्याने सहकारी संस्था देखील डबघाईला आल्या – किसनराव देशमुख (माजी विकासो चेअरमन, देशमुखवाडी)

देशमुखवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी हजारो टन उस रावळगाव कारखान्याला दिला मात्र आज देतो, उद्या देतो असे सांगत गेली ५ महिने शेतकऱ्यांना फिरवाफिरव सुरु आहे. उसाचे पैसे न आल्याने शेतकऱ्यांना सोसायटी मार्फत घेतलेले कर्ज फेडता आले नाही. त्यामुळे अ वर्गात असणारी आमची संस्था डबघाईला येऊन क वर्गात गेली. शेतकरी थकबाकीदार झाल्याने पुन्हा कर्ज मिळाले नाही, मग शेतकऱ्यांनी करायचे तरी काय ? आम्ही १५ ते २० शेतकरी रावळगाव येथे कारखान्यावर गेलो असता तेथे कुणीच भेटले नाही. या प्रश्नावर सर्वांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे की काय अशी परिस्थिती असताना आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला आहे, ते जी भूमिका ठरवतील त्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही कुठल्याही लढ्यासाठी तयार असल्याची प्रतिक्रिया देशमुखवाडी येथील प्रगतीशील शेतकरी व विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन कृष्णराव देशमुख यांनी मनोगतात दिली.
तर उसतोड मुकादामांच्या वतीने बहाळ येथील शांताराम आबा यांनी मनोगतात सांगितले की रावळगाव कारखान्याने कुठलीही अनामत रक्कम न देता आमच्याकडून शेतकऱ्यांचा उस तोडून घेतला. आम्हाला तर मजुरांचे पैसे देखील व्याजाने काढून द्यावे लागले. अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडे बघून कारखान्याला उस दिला त्यांना देखील व्याजाने पैसे काढून शेतीकामांसाठी भांडवल द्यावे लागले. कारखान्याने आम्हाला देखील फसवल्याने आमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगीतले.

हा लढा शेतकऱ्यांचा, कुठल्याही राजकीय अपप्रचाराला बळी पडू नका – संजय भास्करराव पाटील (पंचायत समिती गटनेते)

चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक आंदोलन करणारा, त्यांच्यासाठी १२ दिवस जेल भोगणारा आमदार आपल्याला लाभला आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभे न राहता आता आमदारांनीच शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहावे व त्यांना न्याय मिळवून द्यावा. बागलाण, नगर जिल्ह्यातील शेतकरी हे आपल्या प्रश्नांसाठी राजकीय गट तट बाजूला ठेवून एकत्र येतात मात्र आपल्या तालुक्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनावर देखील राजकीय पोळी भाजण्याचे कारस्थान काही मंडळी करतात, या बैठकीनंतर देखील उस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काही राजकीय मंडळी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील मात्र हा लढा शेतकऱ्यांचा आहे, त्यामुळे कुठल्याही राजकीय अपप्रचाराला शेतकऱ्यांनी बळी पडू नये असे आवाहन चाळीसगाव पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील केले.

रावळगाव साखर कारखान्याकडून उडवाउडवीची उत्तरे, वैजापूर येथून आलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा

चाळीसगावच नव्हे तर शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यातीलही शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यानी रावळगाव येथील एम.जे.शुगर्स कारखान्याला ऊस दिला आहे. मात्र गत सहा महिन्यांपासून साखर कारखाना व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. ऊसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतक-यांची अवस्था दयनीय झाली असून त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोशल माध्यमावरील बैठकीचा संदेश वाचून वैजापूर तालुक्यातील सहा शेतकरी शनिवारी चाळीसगाव येथे झालेल्या बैठकीला उपस्थित राहिले. त्यांनी आपली आपबिती येथे कथन केली.

तर भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते उद्धवराव माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव पाटील यांनी अलिबाग येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत कारखान्याचे मालक जयंत पाटील यांच्या भेटीचा अनुभव सांगितला, तसेच एक शेतकऱ्याचा मुलगा व तालुक्याचा आमदार या नात्याने आमची काळजी घेतली असेही त्यांनी सांगितले, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे यांनीदेखील मनोगतात आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले, गेल्या २५ ते ३० वर्षांपासून राजकीय क्षेत्रात आहे मात्र शेतकऱ्यांसाठी पोटतिडकीने काम करणारा पहिला लोकप्रतिनिधी आमदार मंगेश चव्हाण यांच्यारुपाने पाहण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीचे सूत्रसंचालन अमोल चव्हाण यांनी तर आभार दिनेश माळी यांनी मानले.

Protected Content