एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । एरंडोल शहरातून जळगाव येथे येत असलेल्या तरुणांच्या दुचाकीला पिंपळकोठा गावाजवळ समोरून ट्रक आल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. त्यात जळगावचा २२ वर्षीय तरुण ठार झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांचा आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. राज उर्फ राजेश विनोद बनसोडे (वय २२ वर्ष, रा. डॉ. आंबेडकर नगर, जुने जळगाव, हल्ली मु. एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, राज बनसोडे हा तरुण डॉ. आंबेडकर नगरात आई व दोन बहिणींसह राहत होता. राजेश हा पूर्वी जिल्हा रुग्णालयामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला होता. आता सध्या तो एरंडोल शहरात मामाकडे राहत होता व बँड पथकात कामाला होता. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.
दरम्यान, रविवारी १४ एप्रिल रोजी कार्यक्रमानिमित्त राजेश हा त्याच्या मित्रासोबत संध्याकाळी जळगाव शहरात जाण्यासाठी निघाला. पिंपळकोठा गावानजीक संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास समोरून अचानक ट्रक आल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. त्यात दुचाकी घसरून राजेश व त्याचा मित्र गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले असता तेथे राजेश बनसोडे याला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून मयत घोषित केले.
तर त्याच्या मित्रावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. राजेश बनसोडे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच जळगावात डॉ. आंबेडकर नगर येथे शोककळा पसरली. कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मित्र व नातेवाईकांनी रात्री मोठी गर्दी केली होती.