किरकोळ वादातून डोक्यात काचेचा ग्लास फोडल्याने तरूण गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात किरकोळ कारणावरून एका तरुणावर काचेच्या ग्लासने हल्ला करून त्याला गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी (११ फेब्रुवारी) रात्री १०.३० वाजता घडली. हल्लेखोराने जखमी तरुणाला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल अशोक भारुडे (३०, रा. शिरसोली, ता. जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबासह शिरसोली गावात राहतो. तो खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी रात्री १०.३० वाजता तो जेवणाचे बिल भरण्यासाठी हॉटेल प्रीत येथे गेला होता. त्यावेळी राहुल संजय पवार (रा. शिरसोली) याने किरकोळ वादातून राहुल भारुडे याच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ सुरू केली. वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त आरोपीने काचेचा ग्लास भारुडे यांच्या डोक्यात फेकून मारला. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

प्रसंगावधान राखून स्थानिक नागरिकांनी जखमी राहुल भारुडे याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर बुधवारी (१२ फेब्रुवारी) मध्यरात्री २ वाजता राहुल भारुडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपी राहुल संजय पवार याच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content