जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील बोरनार गावातील बसस्थानक येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला दोन जणांकउून लोखंडी सळईने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद प्रताप सोनवणे (वय-३३) रा. बौध्दवाडा बोरनार ता. जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. हातमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता विनोद सोनवणे हा गावातील बसस्थानकाजवळ उभा असतांना गावात राहणारे गौतम राजू सोनवणे आणि अमोल अशोक थोरात या दोघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घातला. यात दोघांनी लोखंडी सळईने विनोद सोनवणे याला बेदम मारहाण करून दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या विनोद सोनवणे याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विनोद सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गौतम सोनवणे आणि अमोल थोरात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील करीत आहे.