जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील भंगारदुकान फोडल्याच्या संशयावरून एका तरुणाला ४ जणांनी बेदम मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडली होती. या प्रकरणी सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, संदीप भास्कर ढोके वय-२७ रा. खंडेराव नगर जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. १४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता सुमारास जळगाव शहरातील गेंदलाल मिल भागात संदीप ढोके हा आला होता. त्या ठिकाणी भंगाराचे दुकान संदीप ढोके याने फोडल्याच्या संशयावरून गेंदलाल मिल परिसरात राहणारे गुलाब भंगारवाला, तसेच भाऊ नशीर, त्याचा मुलगा बाबा आणि त्याची पत्नी अशा चौघांनी संदीप ढोके याला शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण केली, तर वायरने पाठीवर, हातावर मारहाण केल्याने गंभीर दुखापत केली. दरम्यान जखमी झालेल्या संदीप ढोके याला उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता संदीप ढोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार पुरुषोत्तम वागळे करीत आहे.