फ्रेंचाइजी देण्याचे आमिष दाखवत पाचोरा येथील तरुणाची ११ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । पिझ्झा विक्रीसाठी प्रसिध्द असलेल्या एका बड्या कंपनीची फ्रेंचाइजी देण्याचे आमिष दाखवून, पाचोरा येथील एका युवकाची तब्बल ११ लाख ५० रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा शहरातील जामनेर रोडवर वास्तव्याला असलेल्या एका २१ वर्षीय युवकाला पाचोऱ्यात पिझ्झा विक्रीची फ्रेंचाइजी घेण्यासाठी हरिष जैन नामक व्यक्तीचा २६ एप्रिल रोजी फोन आला. त्यानंतर त्या युवकाकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेतला. तसेच आवश्यक कागदपत्रं देखील मागविण्यात आले. सर्व प्रक्रिया पारदर्शक असल्याचे भासवून संबधिताने युवकाचा विश्वास संपादन केला. तसेच या व्यवसायात कोणी भागिदार असल्याचीही विचारणा करुन, त्याची देखील माहिती ऑनलाईन भरुन देण्यात आली. सर्व माहिती दिल्यानंतर, जैन या व्यक्तीने त्याचा बँक खात्याचा क्रमांक देऊन, त्या खात्यावर फ्रेंचाइजीसाठीची रक्कम भरण्यास सांगितली. त्या युवकाने देखील २६ एप्रिल ते ५ मे दरम्यान एकूण ११ लाख ५० हजार रुपये संबधिताच्या खात्यावर वर्ग केली. मात्र, त्यानंतर संबधित व्यक्तीने तीन दिवसांपासून फोन बंद करुन ठेवला. त्या युवकाने संपर्क साधला असता संपर्क होत नसल्याने, युवकाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या युवकाने गुरुवारी १६ मे रोजी दुपारी ४ वाजता जळगाव सायबर पोलिसांकडे हरिष जैन नामक व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करत आहेत.

Protected Content