वरणगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील सिध्देश्वर नगरात राहणाऱ्या तरूणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना वरणगाव रेल्वे स्थानकाजवळ उघडकीला आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंकज कडू माळी वय ३२ रा. सिध्देश्वर नगर, वरणगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, पंकज माळी हा तरूण आपल्या परिवारासह वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगरात वास्तव्याला होता. मजुरीचे काम करून तो उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, मंगळवारी ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेला होता. वरणगाव रेल्वेस्थानकाजवळील रेल्वेरूळावर धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार रेल्वे कर्मचारी कामावर जात असतांना बुधवारी १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वरणगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मयताच्या खिश्यातील कागदपत्राच्या आधारे ओळख पटली. याप्रकरणी दुपारी १२ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.