चौथ्या मजल्यावरून पडल्याने तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी खिडकीचे ग्रील बसविण्याचे काम करतांना अचानक तोल गेल्याने मजूर चौथ्या मजल्यावरून पडला होत्या. त्याला गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख वाहिद शेख रफिक (वय-३४) रा. शाहु नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शाहू  नगरात शेख वाहिद शेख रफिक हा तरूण आपल्या आई, पत्नी व दोन मुलींसह वास्तव्याला होता. इमारतीच्या खिडक्या बसविणारा ठेकेदाराकडे पाच वर्षापासून कामाला होता. ठेकदाराचे सिंधी कॉलनीत एका बांधकाम केलेल्या इमारतीला खिडक्या बसविण्याचे काम घेतले होते. ३ ऑगस्ट रोजी या इमारतीला खिडकी बसविण्यासाठी शेख वाहिद हा देखील गेला होता. त्यावेळी दुपारच्या सुमारास खिडकी बसवितांना अचानक तोल गेल्याने तो चौथ्या मजल्यावरून खाली पडला. येथे काम करणाऱ्या मजूरांनी तातडीने जखमी अवस्थेत गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. सोमवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता उपचार सुरू असतांना त्याची प्राणज्योत मालविली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरूणाच्या पश्चात आई मुमताजबी, भाऊ इरशाद, पत्नी फरजाना आणि तेहरीन व आयात या दोन मुली असा परिवार आहे.

 

Protected Content