महिलेचे बंद घर फोडून ७३ हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या किर्ती बापू साळुंखे (रा. निमखेडी शिवार) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी रोख ५ हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ८ जून ते १३ जून दरम्यान घडली. याप्रकरणी शुक्रवारी 14 जून रोजी दुपारी ३ वाजता तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरापासून जवळ असलेल्या निमखेडी शिवारातील विष्णूपार्क परिसरात राहणाऱ्या किर्ती साळुंखे या पती, मुलांसह ८ जून रोजी केदारनाथ, बद्रीनाथ यात्रेला गेलेले आहे. त्या वेळी चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोख पाच हजार रुपये तसेच सोन्याचा हार, सोन्याचे झुमके, सोन्याचे डोरले, सोन्याच्या तीन बाळ्या असा एकूण ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

या विषयी साळुंखे यांच्या शेजारील व्यक्तीने त्यांना १३ जून रोजी संपर्क साधून तुमच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटला असल्याचे सांगितले. त्यावेळी साळुंखे यांनी त्यांचे भाऊ योगेश भागवत सोनवणे यांना घरी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. ते तेथे गेले असता घरात चोरी होऊन वरील मुद्देमाल चोरीला गेल्याचे समजले.

याप्रकरणी योगेश सोनवणे यांनी शुक्रवार १४ जून रोजी दुपारी ३ वाजता तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी करीत आहेत.

Protected Content