जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हप्त्याने काढून दिलेल्या मोबाईलच्या पैसे मागितल्याच्या कारणावरून कुसुंबा येथील महिलेला तिघांनी दारूच्या नशेत व मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत गुरूवार २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोमल दीपक पाटील (वय-२६) रा. माऊली नगर, कुसुंबा ता. जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला असून घरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. महिलेच्या नावाने गावातील विकास पाटील याला मोबाईल हप्त्याने काढून दिला होता. दरम्यान कोमल पाटील यांनी गुरुवार २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हप्त्याचे पैसे मागितले. याचा राग आल्याने विकास पाटील, सागर पंडित पाटील आणि साहेबराव पाटील सर्व रा. कुसुंबा ता.जि.जळगाव यांनी दारूच्या नशेत येऊन महिलेला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. जखमीवस्थेत महिलेला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या जबाबावरून गुरुवारी २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी विकास पाटील, सागर पंडित पाटील आणि साहेबराव पाटील तिघे रा. कुसुंबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.