किरकोळ कारणावरून महिलेसह तिच्या मुलाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरासमोर असलेल्या गटारीवरील स्लॅबचे काम करत असलेल्या महिलेला शिवीगाळ करीत तिच्यासह मुलाला मारहाण केल्याची घटना पिंप्राळा परिसरातील कुंभारवाड्यात घडली. यावेळी तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळ्यातील कुंभारवाड्यात छाया पितांबर बैरागी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या घराच्या अंगणात असलेल्या गटारीचे बांधकाम झाल्याने त्या स्लॅबचे काम करीत होत्या. याचवेळी अरुण कोळी, जितेंद्र कोळी व त्याचा लहान भाऊ तिघे रा. कोळीवाडा यांच्यासह दोन जण तिथे आले. त्यांनी महिलेला तू येथे स्लॅब का टाकत आहे असे म्हणत या जागेचे पैसे मला दे असे म्हणाले. त्यावर महिलेने कोर्टात केस सुरु असून कोर्टाचा जो निर्णय येईल त्यानंतर पाहू असे सांगितले. दरम्यान, जितेंद्र कोळी याने महिलेला शिवीगाळ करीत त्याच्या हातातील टिकावचा दांडा डोक्यात व हातापायावर मारुन गंभीर जखमी केले. याचवेळी महिलेला मुलगा यश हा आवरण्यासाठी आला असता, त्याला देखील मारहाण करीत गंभीर जखमी केले. हे भांडण परिसरातील नागरिकांनी सोडावित जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content