जिल्हा न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण ७७० प्रकरणांचा निपटारा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ७७० प्रकरण निकाली काढण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  एम.क्यू.एस.एम. शेख यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरीक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन उपस्थित होते.

ममुराबादजवळ अपघातात सोपान भादू रोटे (रा. नशिराबाद) हे जखमी झाले होते. मोटार अपघात विमा प्रकरणी कामकाज सुरू असताना ते दुसऱ्या मजल्यावर पोहचू शकत नव्हते. त्यामुळे पॅनल प्रमुख न्या. जयदीप मोहिते यांच्यासह विधी सेवा प्राधिकारणचे पदाधिकारी थेट रिक्षाजवळ पक्षकारापर्यंत पोहचले व त्यांना तीन लाख १५ हजार रुपयांची मदत दिली. या सोबतच दुसऱ्या अपघातात जखमी झालेले कैलास रामदास इंगळे यांचा पाय कापावा लागला. त्यामुळे ते व्हील चेअरवर होते. त्यांनाही पॅनलपर्यंत जाणे शक्य नसल्याने न्या. एस.आर. पवार यांच्यासह पदाधिकारी पक्षकारापर्यंत पोहचले व त्यांना १३ लाख रुपयांची मदत दिली. या दोन्ही प्रकरणात पक्षकारांच्यावतीने ॲड. महेंद्र चौधरी तर विमा कंपनीतर्फे ॲड. प्रसाद गोडबोले यांनी कामकाज पाहिले.

या वेळी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, दोन्ही बाजूचे पक्षकार यांच्या मदतीने पाच हजार ९२  दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबित एक हजार २८५  प्रकरणे निकाली काढण्यात आली. या माध्यमातून बँक वसुली, अपघात विमा, धनादेश अनादर व अन्य प्रकरणांमधील एकूण २८ कोटी ८४ लाख ३९ हजार ६०२ रुपये एवढ्या रक्कमेची तडजोड झाली. या सोबतच ४ सप्टेंबर ते ८ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष कामकाजात (स्पेशल ड्राईव्ह) एकूण ७७० प्रकरण निकाली काढण्यात आले.

Protected Content