जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील मेहरुण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या मैत्रिणींचे सात मोबाईल चोरी झाल्याची घटना रविवारी १२ मे सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला मेहरून परिसरातून अटक केली आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल रघुनाथ चव्हाण वय-३४, रा. रोटवद तांडा ता.जामनेर असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवीतेजा अशोक मिंडे (वय-२१, रा.लोकेश्वरम, तेलंगणा, ह.मु.साईगीता नगर, जळगाव) ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी जळगावला आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत राहत आहे. रविवारी १२ मे रोजी सुट्टी असल्याने मित्र व मैत्रिणींसोबत शहरातील मेहरुण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेल्या असताना, सायंकाळी ७ वाजेच्या सूमारास गणेशघाट परिसरातून सोबतच्या नवीतेजा मिंडेसह मैत्रिणींचे एकूण ८१ हजार किंमतीचे सात मोबाईल चोरून नेले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली. मेहरून परिसरात बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या वॉचमनेच केल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश ठाकरे यांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुंडे, किशोर पाटील, योगेश बारी, ललित नारखेडे, चंद्रकांत पाटील यांनी मोबाईल चोरटा अनिल रघुनाथ चव्हाण वय-३४, रा. रोटवद तांडा ता. जामनेर याला गुरुवारी १६ मे रोजी रात्री १० वाजता मेहरून परिसरातून अटक केली. त्याच्याकडून चोरी झालेले मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे.