Home क्राईम भरधाव ट्रकची कारला धडक; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !

भरधाव ट्रकची कारला धडक; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गजबजलेल्या आकाशवाणी चौकात आज मंगळवारी २१ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकातून एक भरधाव ट्रक जात असताना, त्याने समोरून जाणाऱ्या कारला जोराची धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर ट्रक चालक आणि कार चालक यांच्यात रस्त्याच्या मधोमध शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. यामुळे त्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दोन्ही चालकांना शांत केले. या प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ दोन्ही वाहने बाजूला घेतली. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही आणि तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांनी दोन्ही वाहनधारकांना रामानंदनगर पोलीस ठाण्यात नेले आहे. या अपघातामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound