भडगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या चारचाकी वाहनांसह दोन संशयित दरोडेखोरांना भडगाव पोलिसांनी अटक केली आहे. यातील तीन जण फरार झाले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे रविवारी १४ मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भडगाव शहरातील मेनरोड भागात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कासोदा येथून संशयास्पद रित्या पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ कार ही भडगाव शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पिंपळगाव फाटा येथे सापळा रचून स्कार्पिओ वाहन चालकाने पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. यामध्ये पुढे जाऊन स्कार्पिओ थांबल्यानंतर वाहनाची तपासणी केली, असता यामध्ये दरोडा टाकण्याचे साहित्य, मोबाईल रॉड, चाव्या आढळून आल्या. तर मुकेश विठ्ठल पाटील वय 24 रा. पाळधी तालुका धरणगाव आणि रोशन मधुकर सोनवणे वय 33 रा. अंबिका नगर वडजाई रोड धुळे या दोन जणांना अटक केली असून शशिकांत सदाशिव मोरे, रा. धुळे, फयाज शेख रा. पाळधी ता. धरणगाव आणि एक अनोळखी असे तीन जण फरार झाले. पोलिसांनी वाहनासह मुद्देमाल हस्तगत केला आहे. भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून रविवारी १४ मे रोजी सकाळी १० वाजता भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाले करीत आहे.