धावत्या रेल्वेतून पडल्याने रेल्वे हॉस्पिटल कर्मचाऱ्याचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ड्युटी आटोपून घरी परतणारे ५६ वर्षीय रेल्वे हॉस्पिटलमधील कर्मचारी धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आसोदा ते भादली दरम्यान उघडकीला आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चंद्रकांत आनंदा मराठे वय ५६, रा. राधाकृष्ण नगर, जळगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील राधाकृष्ण नगरात चंद्रकांत मराठे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. गुरूवारी १ ऑगस्ट रोजी ते ड्युटी आटोपून दुपारी ३ वाजेच्या सुमारास रेल्वेने घरी येण्यासाठी निघाले. परंतु असोदा ते भादली दरम्यान असलेल्या खांबा क्रमांक ४२७ च्या २४ आणि २६ मध्ये ते धावत्या रेल्वेतून पडले. यावेळी त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची मोबाईलवरुन संपर्क साधण्यास सुरुवात केली. मात्र समोरुन कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास गँगमनला असोदा ते भादली दरम्यान, रेल्वेच्या रुळामध्ये मृतदेह दिसून आला. त्याने घटनेची माहिती तात्काळ नशिराबाद पोलिसांना दिली. त्यानुसार पोहेकॉ अनिल देशमुख, सागर बिडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाजवळील मोबाईलवरुन संपर्क साधल्यानंतर चंद्रकांत मराठे यांची ओळख पटली. पोलिसांनी घटनास्थही पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी त्यांच्या नातेवाईकांनी मनहेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Protected Content