सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर येथून पुण्याला जाणार्या खासगी लक्झरी बसने आज अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. सुदैवाने यात अनर्थ टळला असला तरी प्रवासातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रावेर येथून साईसिध्दी कंपनीची खासगी लक्झरी बस ही पुण्याकडे जाण्यासाठी निघाली. दरम्यान, निंभोरा फाट्याजवळ अचानक गाडीतून धुर निघू लागल्याने चालकाने गाडी थांबवत प्रवाशांना बाहेर काढले. यानंतर काही वेळातच गाडीने पेट घेतला. यानंतर आग चांगलीच भडकली.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी धाव घेत लक्झरीची आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्नीशामक दलाच्या पथकाने आग विझवण्यासाठी मदत केली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. अनेक खासगी लक्झरी वाहनांमधून असुरक्षीत वाहतूक केली जाते. आज असाच प्रकार घडला असून यातून सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.