जम्मू-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. तीर्थयात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. अखनूर येथे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात २१ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर ४० भाविक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरु आहे. जखमींना जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण ५० प्रवाशी प्रवास करत होते. बसमधील बहुतेक प्रवासी हे उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा येथील होते. सर्वजण रायसी जिल्ह्यातील प्रसिद्ध शिव खोरी मंदिराकडे जात होते. त्यानंतर प्रशासन काही वेळाने घटनास्थळी दाखल झाले. लष्कर आणि प्रशासनाने संयुक्तपणे बचावकार्य सुरु करत जखमींना लवकरात लवकर वैद्यकीय मदत पुरवली. या अपघातात काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.