भिवंडी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भिवंडीमध्ये रागातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भिवंडीमध्ये सुक्या मेव्याच्या दुकानातील चोरीचा भंडाफोड करणार असल्याच्या रागातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. भिवंडीत दोन जणांनी ही हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकलेश जयसिंग चौहान असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी सकाळी दहा ते साडे दहा वाजताच्या सुमारास कल्याण भिवंडी रस्त्यावरील साईबाबा मंदिराच्या पाठीमागील जंगलात त्याच्या चेहऱ्यावर तोंडावर मोठा दगड मारून हत्या केल्याचे उघडकीस आले. दोन्ही आरोपी सुक्या मेव्याच्या एका दुकानाता कामाला होते. मृत व्यक्ती देखील त्याच दुकानात कामासठी होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मृताची ओळख पटवली.
त्यानंतर साईबाबा मंदिर व परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पद्मानगर परिसरातून इकलाख अहमद अली अन्सारी आणि रामनारायण सितोसी चव्हाण या दोन संशयितांना ताब्यात घेतले. आरोपी इकलाख अन्सारी याने ड्रायफ्रुट दुकानात केलेल्या चोरीचा प्रकार हत्या झालेल्या इसमास माहित होता. घडलेला प्रकार तो लवकरच उघड करणार होता या रागातून त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होताच अवघ्या सहा तासात दोघा आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले आहे