जळगाव प्रतिनिधी । शहरातील उस्मानिया पार्क येथे अंगणात खेळत असलेल्या दीड वर्षाच्या बालकांवर पिसळलेला कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज गुरूवारी सकाळी १० वाजता घडली. सुदैवाने नागरीकांच्या सतर्कतेने वेळीच बालकाला वाचविले. जखमी बालकाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील उस्मानिया पार्क येथे शाहरूख खान हे आपल्या कुटुंबियासह राहतात. ते पेंटर काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्याचा दीड वर्षाचा मुलगा इरफान शाहरूख खान राहत्या घराच्या अंगणात आज गुरूवारी सकाळी १० वाजता एकटाच खेळत होता. अचानकपणे एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकटा खेळत असलेल्या बालकांवर हल्ला केला. कुत्र्याने बालकाच्या मानेवर मोठ्याने चावा घेतला. यात बालक गंभीर जखमी झाला. बालकावर कुत्र्याने हल्ला केल्याचे पाहून आई नाजमीबी यांनी आरडाओरड केली. त्यावेळी परिसरातील नागरीकांनी धाव घेवून बालकाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. तातडीने खासगी वाहनाने जखमी बालकाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारर्थ दाखल करण्यात आले आहे.