दातृत्वाचा एक नवा आदर्श – चिमुकल्यांनी जमा केली ५२ हजार रुपयांची मदत

पहूर, ता.जामनेर, रविंद्र लाठे | शाळेतील विद्यार्थिनीच्या उपचारासाठी पहूर येथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबवत दातृत्वाचा एक नवा आदर्श निर्माण करत ५२ हजार रुपयांची मदत केली आहे.

‘सहानभूतीच्या हजार शब्दापेक्षा मदतीचा एक हात अधिक श्रेष्ठ असतो’ असं म्हणतात. प्रत्यक्ष कृती करतांना या एका हाताला अनेक हातांची एकजूट लाभली तर कठीण संकटाचाही सामना करण्याचं बळ लाभत असतं. कथा, कादंबऱ्यात किंवा एखाद्या काल्पनिक मालिकेत मदतीची अशी अनेक उदाहरणे दिसून येतात मात्र वास्तवात असं काही घडलं तर समाजापुढे एक नवा आदर्श उभा राहतो.

असाच एक नवा आदर्श निर्माण करणारी घटना घडली आहे, जामनेर तालुक्यातील पहूर या गावी. पहूर येथील आर टी लेले हायस्कूलमध्ये इयत्ता सहावी शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीच्या पोटात अचानक दुखायला लागल्याने तिला दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासून तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे सांगताच पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली. अतिशय गरीबीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबाकडे मुलीच्या उपचारासाठी पुरेसा पैसा नसल्याचे त्यांनी शाळेतील शिक्षकांना सांगितले.

पालकांची हलाखीची परिस्थिती असलेल्या या विद्यार्थिनीच्या वैद्यकीय उपचारासाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.बी.पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांनी स्वतः प्रत्येकी ५०० रुपयांची मदत केली. विद्यार्थ्यांसह पुढे येत ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून गावातून मदत फेरी काढली. यात पहूर ग्रामस्थांनीही आपापल्या परीने जमेल ती आर्थिक मदत केली आणि गावातून लोकसहभागातून ५२ हजार रुपयांची मदत मिळवीली आणि ती पालकांच्या स्वाधीन केली. व्हाईस चेअरमन साहेबराव देशमुख यांच्याहस्ते उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने ही मदत पालकांच्या स्वाधीन करण्यात आली

सध्या त्या विद्यार्थीनीवर पाचोरा येथे उपचार सुरू असून शाळेचे मुख्याध्यापक आर.बी.पाटील यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या तिच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली. स्वार्थ आणि फसवणुकीच्या अनेक घटना समाजात घडत असताना ‘पहूर’ येथील आर.टी.लेले हायस्कूल शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी दातृत्वाचा एक नवा आदर्श उभा केला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील दानशूर दात्यांनी सुद्धा सढळ हाताने मदत करत या विद्यार्थिनीच्या उपचारासाठी निधी दिला. जमा झालेला मदतनिधी पालकांना सुपूर्द करण्यात आला. निधी सुपूर्द करताना विद्यार्थ्यांचे मन भरून आले. या प्रसंगी शिक्षकांच्या विद्यार्थांच्या प्रती असलेल्या बांधिलकीतून दातृत्वाचा अनुभव उपस्थितांना अनुभवता आला .

याप्रसंगी पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन साहेबराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, संचालक अॅड.एस.आर.पाटील, माजी सरपंच लक्ष्मण गोरे, उपसरपंच राजू जाधव, योगेश भडांगे, ज्ञानेश्वर करवंदे, शिवाजी राऊत, ईश्वर देशमुख, पत्रकार शरद बेलपत्रे, मनोज जोशी, प्रवीण कुमावत, शंकर भामेरे, चेतन रोकडे यांच्यासह शाळेचे वरीष्ठ लिपीक किशोर पाटील यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content