अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर अमळनेरमध्ये शोकाकुल वातावरणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “सतत वेळ पाळणाऱ्या अजितदादांनी आयुष्याची वेळ पाळली नाही. आज आम्ही कोणाकडे पाहायचे?” अशा शब्दांत आमदार अनिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवार यांच्यावरील ऋण व्यक्त केले.
अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात १ तारखेला सकाळी ९ वाजता आयोजित या सर्वपक्षीय शोकसभेत विविध पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

आमदार अनिल पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, २०१६ साली त्यांच्या आयुष्यात कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्या काळात आपण भाजपमध्ये असतानाही अजित पवार यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाठीवर हात ठेवला. “त्यावेळी दादांचा आधार मिळाला नसता तर कदाचित मी आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहोचलो असतो. आज मी जो काही आहे, तो अजितदादांमुळेच,” असे भावुक उद्गार त्यांनी काढले.
अमळनेर तालुक्यातील विकासाच्या कायापालटात अजित पवार यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. आमदारांच्या समस्या आपुलकीने ऐकून प्रत्येकाला भावाप्रमाणे वागणूक देत न्याय देण्याचे काम अजित पवार यांनी केले, असे त्यांनी सांगितले. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पाडळसरे धरणाच्या रखडलेल्या कामाला गती देऊन आज जो पाणीसाठा उपलब्ध आहे, ती अजित पवार यांचीच देण असल्याचे स्पष्ट केले.
या शोकसभेत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर, ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, भैरवी पलांडे, डॉ. अविनाश जोशी, संजय पुनाजी पाटील, संदीप घोरपडे, डी. एम. पाटील, शिवाजी पाटील, बी. के. सूर्यवंशी, मनोज पाटील, भागवत पाटील, खा. शि. मंडळ चेअरमन निरज अग्रवाल, वसुंधरा लांडगे, माजी सभापती डॉ. दीपक पाटील, सरपंच संघटनेतर्फे महेंद्र बोरसे, ॲड. शकील काझी, ॲड. तिलोत्तमा पाटील, मंगळ ग्रह मंदिरतर्फे दिलीप बहिरम, आम आदमी पार्टीतर्फे प्रा. गणेश पवार, नितीन भदाणे, इम्रान खाटिक, रिपाईतर्फे यशवंत बैसाणे, शिवसेनेतर्फे महेश देशमुख, अनिल शिसोदे, मुन्ना शर्मा, अमित पाटील, प्रा. योगिता कापडणे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.
शोकसभेचे आयोजन मराठा समाजाचे विक्रांत पाटील व संजय पाटील, भाजपचे शीतल देशमुख व उमेश वाल्हे, पत्रकार संघाचे चेतन राजपूत व जितेंद्र ठाकूर, राष्ट्रवादीचे भूषण भदाणे, शेतकी संघाचे संजय पाटील तसेच विविध पक्ष व समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, बिपीन पाटील, ॲड. ललिता पाटील, सुलोचना वाघ, रिटा बाविस्कर, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, सुषमा देसले, प्रा. अशोक पवार, मुक्तार खाटीक, राजेंद्र देशमुख, श्याम पाटील, हेमंत पवार तसेच विविध सामाजिक, शासकीय, व्यापारी, कामगार, महिला व पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



