Home Cities जळगाव जमाअत-ए-इस्लामी हिंदचा स्वातंत्र्यलढ्यातील अल्पसंख्याकांच्या भूमिकेवर शैक्षणिक उपक्रम

जमाअत-ए-इस्लामी हिंदचा स्वातंत्र्यलढ्यातील अल्पसंख्याकांच्या भूमिकेवर शैक्षणिक उपक्रम


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात विविध अल्पसंख्याक समाजघटकांनी दिलेल्या योगदानाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने जमाअत-ए-इस्लामी हिंद, जिल्हा जळगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित लेखन, भाषण आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांचा शहरस्तरीय समारोप व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. इकरार थीम कॉलेज येथील मोतीवाला हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा, पालकांचा व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमाअत-ए-इस्लामी हिंद, जळगावचे जिल्हाध्यक्ष मा. सुहेल आमिर शेख होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. इजाज मलिक, शेख अब्दुल्ला सर, मुफ्ती अबूझर कासमी, आफिफा मॅडम, सन्माननीय नसरिन बाजी आणि खुर्शीद बाजी उपस्थित होते. शहरातील विविध शाळांमधील मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक व पालकांसह उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाचे शैक्षणिक महत्त्व अधोरेखित झाले.

स्पर्धांचे आयोजन दोन टप्प्यांत करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात शाळास्तरावर भाषण व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची शहरस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे शहरस्तरावरील पारितोषिके जाहीर करण्यात आली.

यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी, प्रमाणपत्रे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्वातंत्र्यलढ्यातील विविध समाजघटकांचे योगदान जाणून घेणे ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी बाब आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जाणीव निर्माण होते, संशोधनाची आवड वाढते आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. एजाज मलिक यांनी अल्पसंख्याक समाजांच्या ऐतिहासिक भूमिकेवर प्रकाश टाकला, तर मुफ्ती अबूझर कासमी यांनी स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात सुहेल आमिर शेख यांनी युवकांनी देशाच्या विकासात सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. त्यांनी सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी व आयोजकांचे आभार मानत भविष्यातही अशा शैक्षणिक व वैचारिक कार्यक्रमांचे सातत्य राखले जाईल, असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंद आणि संलग्न संघटनांसह विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.


Protected Content

Play sound