भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील शिवणी येथे फिर्यादीची गाय शेतात चरण्यासाठी गेल्याच्या किरकोळ कारणावरून एका शेतकऱ्यांला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हाणामारीत एकजण हे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील शिवणी गावात फिर्यादी संभाजी भास्कर खैरे (वय ४५) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. २५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास फिर्यादीची गाय दोरी तोडून आरोपी विलास पंडित खैरे यांच्या शेतात चरण्यासाठी गेली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी विलास खैरे, मुकेश खैरे, अमोल खैरे आणि त्यांच्या इतर चार नातेवाईकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, आरोपी विलास खैरे याने हातातील काठीने फिर्यादीच्या डोक्यावर प्रहार केला, तर मुकेश खैरे याने फिर्यादीच्या तोंडावर वीट मारून त्यांना जखमी केले. भडगाव पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



