राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप; ३२ नेत्यांनी काँग्रेसला रामराम करत केला भाजपमध्ये प्रवेश

जयपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी कॅबिनेट मंत्री लालचंद कटारिया यांच्यासह पक्षाच्या ३२ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कटारिया हे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय आहे. हे नेते राजस्थान राज्याच्या पूर्व भागाचे आहेत. काँग्रेसच्या या नेत्यांसोबत त्यांचे बहुसंख्य कार्यकर्ते भाजपवासी झाले आहेत. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांमध्ये नागौरचे अनेक दिग्गज जाट नेते आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांमध्ये लालचंद कटारिया यांच्यासह गहलोत सरकारमध्ये मंत्री राहिलेले राजेंद्र यादव, माजी आमदार रिछपाल मिर्धा, खिलाडीलाल बैरवा, अलोक बेनीवाल, विजयपाल मिर्धा, भीलवाडाचे माजी जिल्हाध्यक्ष रामपाल शर्मा यांचा समावेश आहे. भाजपमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये दोन माजी मंत्री, चार माजी आमदार सहभागी आहेत.
अंतरआम्याच्या संकेतामुळे मी भाजपमध्ये सहभागी झालो आहे. मु्ख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला पुढे नेण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. असे लालचंद कटारिया भाजप प्रवेशानंतर म्हणाले. हा प्रवेश सोहळा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत राजधानी जयपूर येथील भाजप प्रदेश कार्यालयात संपन्न झाला.

Protected Content