बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सिंदखेडराजा शहरात विकास आराखड्याअंतर्गत राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी सभोवताली सुरू असलेल्या उत्खननादरम्यान १९ मे रोजी यादवकालीन शिवमंदिराचे अवशेष व भव्य असे शिवलिंग सापडले आहे.
अधिक माहितीनुसार वृत्त असे की, सिंदखेडराजा येथे विकास आराखड्याअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी परिसरातही केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागांतर्गत काही दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. हे काम सुरू असताना समाधी चौथऱ्यापासून पाच फूट खोल व समाधी मंदिरापासून साधारण २० फूट अंतरावर मोठे शिवलिंग आढळून आले.
अधिक खोदकाम केले असता शिवलिंगाच्या बाजूला दर्शनी भागात सुबक नक्षीकाम असलेली चौकट मिळून आली. या ठिकाणी आढळून आलेले हे शिवमंदिरच असल्याचा प्राथमिक अंदाज केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या पथकाकडून करण्यात आला आहे. यामुळे ऐतिहासिक वास्तूंमध्ये भर पडली आहे. आणखी अवशेष सापडण्याची शक्यता या परिसराच्या शेजारीच प्रभू श्रीरामचंद्रांनी स्थापन केलेले प्राचीन रामेश्वर मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्खननादरम्यान आणखीही काही अवशेष सापडण्याची शक्यता केंद्रीय पुरातत्त्व विभागाने व्यक्त केली आहे.