उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात

जळगाव, प्रतिनिधी । प्रतिकूल परिस्थिती आणि आर्थिक दुर्बलता यामुळे गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे आवडीच्या विषयात शाखेत प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या मुंबई स्थित सेवा सह्योग संस्थेच्या विद्यार्थी विकास योजनेतून यंदाही गुणवंत योग्य उमेदवारांना सहाय्य केले जाणार आहे.

“जेईई मेन्स, नीट, जीआर” आदी परीक्षेत उत्तम गुण मिळणारे देशातील आय.आय.टी. एन.आय.टी. अथवा नामांकित इंजीनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याचा मार्ग खुला झालेल्या उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्याच प्रमाणे जी.आर.ई. नीट आदी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शाखा अथवा इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांनाही संस्थेच्या वतीने आर्थिक मदत केली जाणार आहे.

केवळ आर्थिक कारणांनी नव्या पिढीतील गुणवत्ता उपेक्षित राहू नये त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यते इतके शिक्षण घेता यावे या तळमळीतून ठाणे येथील टीजेएसबी बँकेचे सीईओ पद भूषविलेले रवींद्र कर्वे यांनी निवृत्तीनंतर सहकार्‍यांसह ही चळवळ सुरू केली. यंदा कोरोनाचे संकटामुळे सर्वसामान्यांचे जीवन अधिक कष्टमय झाले आहे. अशा परिस्थितीत व्यावसायिक शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न अधुरे राहण्याची भीती आहे, त्यामुळेच विद्यार्थी विकास योजनेत अशा उमेदवारांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

संस्थेचे पदाधिकारी त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्या कुटुंबाची संवाद साधतील. त्यानंतर पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींना मदत करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील यांनी दिली. अधिक माहितीसाठी रत्नाकर पाटील ९४०५४४४६२७, रविंद्र बर्वे ९३२३२३४५८५, अरुण करमरकर ९३२१२५९९४९ यांना अथवा केशवस्मृती प्रतिष्ठानच्या नवी पेठेतील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content