जुन्या वादातून किराणा दुकानदाराला बेदम मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील बेलदार शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून किराणा दुकानदाराला अश्लिल शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी ६ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता घडली आहे. या संदर्भात दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोहम्मद मोईनुद्दीन सैफद्दीन शेख (वय-३२, रा. बेलदार मोहल्ला, धरणगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे बेलदार शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये किराणा दुकान आहे, किराणा दुकान चालवून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. जुन्या भांडणाच्या कारणावरून शनिवारी ६ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता रियाजोद्दीन शेख लाडजी, शेख प्यारा शेख लाडजी, शेख लियाकत शेख प्यारा, जाहीद शेख प्यारा, शहनाजबी शेख रियाजोद्दीन आणि सिद्दिक शेख रियाजोद्दीन सर्व रा. धरणगाव यांनी मोहम्मद मोईनुद्दीन याला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केले. तसेच अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात दुपारी ४ वाजता तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे ६ जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा हे करीत आहे.

Protected Content