रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम” या घोषणांनी रविवारी संपूर्ण रावेर शहर दुमदुमून गेलं होतं. श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य आणि ऐतिहासिक अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. महालक्ष्मी मंदिर येथून सुरुवात झालेल्या या शोभायात्रेने रावेरमध्ये एक आगळंवेगळं भक्तिमय वातावरण निर्माण केलं. हजारो रामभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहर भगवामय झालं.
श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत पूजा करून शोभायात्रेला शुभारंभ करण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या शोभायात्रेत रामभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत रामभक्तीचा जयघोष केला. डीजेवर वाजणाऱ्या भक्तिगीतांवर तरुणांनी उर्जित नृत्य करत भक्तीचा जल्लोष केला. शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करत शोभायात्रेचं स्वागत केलं.
शोभायात्रेमध्ये महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्धपणे पार पडली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना शोभायात्रेने एकात्मतेचा आणि भक्तीचा संदेश दिला.
यावेळी आमदार अमोल जावळे, तहसीलदार बंडू कापसे, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गनवानी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तसेच डॉ. कुंदन फेगडे, धनंजय चौधरी, अशोक शिंदे, अरुण शिंदे, उमाकांत महाजन, अनिल अग्रवाल, नितीन पाटील, मिरवणूक अध्यक्ष बंटी चौधरी, रवी पाटील, भैय्या धोबी, भास्कर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली रावेर पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आणि होमगार्ड यांनी मिरवणुकीदरम्यान उत्कृष्ट व्यवस्था सांभाळली. याशिवाय, रात्री उशिरा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी रावेरला भेट देत शोभायात्रेचा आढावा घेतला.