जळगाव शहरात श्री अग्रसेन जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

WhatsApp Image 2019 09 28 at 7.08.29 PM

जळगाव, प्रतिनिधी | श्री अग्रसेन महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जयघोष करीत शहरात फटाक्यांच्या आतषबाजीसह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत लहान, मुलांसह, महिला पुरुषांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

शहरातील अग्रवाल नवयुवक मंडळ आणि अग्रवाल महिला मंडळातर्फे श्री अग्रसेन जयंती उत्सवानिमित शनिवारी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सुभाष चौक परिसरातील भवानी माता मंदिर येथून संध्याकाळी अग्रसेन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेला समाजबांधवानी प्रारंभ केला. दाणा बाजार, नवी पेठ, जयप्रकाश नारायण चौक, नेहरू चौक मार्गे शिवतीर्थ मैदान या मार्गाने हजारो समाजबांधवानी सहभाग घेतला.महिलांनी पारंपारिक साडी तर पुरुषांनी कुर्ता पायजमा असा पेहराव केला होता. शोभायात्रेच्या अग्रभागी महाराजा अग्रसेन यांच्या वेशभूषेत जयेश कृष्णकुमार मित्तल हा घोड्यावर आरूढ होता. त्यासह अनेक मुलांनी सजीव देखाव्यात सहभाग घेतला. शोभायात्रेत लहान मुलांसाठी रेल्वेगाडी हे वैशिष्ट्य होते. अमळनेर येथील उद्योजक व समाजसेवक बजरंगलाल बन्सीलाल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.शोभायात्रा झाल्यानंतर हॉटेल क्रेझी होम, आकाशवाणी चौक येथे २१ व २२ सप्टेंबर रोजी झालेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना आर्थिक सहयोग देणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.अग्रवाल नवयुवक मंडळाचे अध्यक्ष मनिष अग्रवाल, सचिव हितेश अग्रवाल, महिला मंडळाच्या अध्यक्षा पूजा अग्रवाल, सचिव सोनल अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी, समाजबांधव आदींनी परिश्रम घेतले.

रविवारी  ध्वजवंदन आणि गुणवंतांचा सत्कार

श्री अग्रसेन जयंती उत्सवानिमित शेवटच्या दिवशी रविवारी दि. २९ रोजी सकाळी विद्या नगरातील अग्रवाल कम्युनिटी सभागृह येथे सकाळी ९ वाजता ध्वजवंदन गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच संध्याकाळी ६ वाजता अग्रसेन महाराजांची पूजा व आरती होवून १० वी, १२ वी तसेच इतर अभ्यासक्रमातील गुणवंतांना आर्थिक सहयोग देणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. महिला मंडळातर्फे “मेरा भारत महान, एक सोने की चिडिया” हे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. प्रसंगी जालना येथील अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे महामंत्री जितेंद्र गिरिधारीलाल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समाजबांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Protected Content