यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बौद्धगया, बिहार येथील महाबोधी महाविहार पंडित ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी आणि ॲक्ट कायदा रद्द करून बौद्धांच्या ताब्यात महाविहार देण्यासाठी यावल शहर आणि तालुक्यातील सर्व समाजबांधवांच्या वतीने ११ एप्रिल रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ फेब्रुवारीपासून देशभरातील धम्मगुरू भन्तेजी बौद्धगया येथे आंदोलन करत आहेत. मात्र, बिहार सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. हिंदू मंदिरे हिंदूंना, मुस्लिम धार्मिक स्थळे मुस्लिमांना, ख्रिश्चन धार्मिक स्थळे ख्रिश्चनांना आणि शीख गुरुद्वारा शीख बांधवांना देण्यात आले आहेत. मग महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यात कसे, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
महाबोधी महाविहार हे जगातील सर्व बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थान आहे. ते बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. बीटी ऍक्ट १९४९ कायदा बिहार सरकारने ब्राह्मण पंडितांच्या हितासाठी बनवला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. भारतीय संविधानानुसार २६ जानेवारी १९५० पूर्वीचे कायदे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे महाबोधी महाविहार बीटी १९४९ कायदा रद्द करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. महाबोधी विहार ट्रस्टचे चेअरमन, सचिव आणि सदस्य बौद्ध असावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. १२ फेब्रुवारी पासून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. मोर्चाची सुरुवात बोरवेल गेट येथून होणार आहे.