मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | समुद्रकिनारपट्टीलगत खारफुटी, खाड्या आणि पर्वतांनी वेढलेल्या नवी मुंबईच्या खारघर येथील नयनरम्य अशा निवासी भागात सोनेरी कोल्हा आढळून येत आहे. दिवसेंदिवस सोनेरी कोल्ह्यांची संख्या आणि ते दिसण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढू लागले आहे. त्यामुळे पर्यावरणवादी आणि प्राणीप्रेमी धोक्याचा इशारा देत आहे. अशा प्रकारच्या वन्य प्राण्यांचे दिसने हे चिंताजनक आहे. वन्य प्राण्यांचा नैसर्गिक आदिवास असलेल्या खारफुटी आणि पाणथळ जागा हळूहळू संपुष्टात येत आहेत. त्यांचा मानवी हस्तक्षेपामुळे नाश होत आहे. परिणामी या प्राण्यांना मानवी वर्चस्व असलेल्या भागात अन्न आणि निवारा घेण्यास भाग पाडत आहे. वन्य प्राण्यांच्या नागरी वस्तीतील प्रवेशास हे प्राणी नव्हे तर मनुष्यच कारणीभूत असल्याचेही हे तज्ज्ञ सांगतात.
पशुप्रेमी असलेल्या प्रदीप चौधरीने अलीकडेच खारघरमधील निवासी वसाहतींच्या दिशेने जाणाऱ्या सोन्हेरी कोल्ह्याचे छायाचित्र काढले. भटक्या कुत्र्यांचे हल्ले, घाबरलेल्या रहिवाशांकडून दगडफेक आणि भरधाव वेगातील वाहनांच्या धडकेच्या जोखमीसह या प्राण्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलत होते. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडच्या काही महिन्यांत सोनेरी कोल्हेचे मृतदेह सापडले आहेत, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल धोक्याची घंटा वाजली आहे. खारघर वेटलँड्स अँड हिल्स फोरमच्या नेत्या ज्योती नाडकर्णी टीओआयशी बोलताना म्हणाल्या, “सागरी हरित आच्छादन आणि पाणथळ जागांच्या पद्धतशीर नाशामुळे हे संघर्ष उद्भवतात. या अधिवासांच्या संवर्धनासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले आणि विलंबामुळे अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला.