अमळनेर येथे राष्ट्रसंत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न

अमळनेर प्रतिनिधी | येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत राष्ट्रसंत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी राष्ट्रसंत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला शाळेतील जेष्ठ शिक्षक वाय.जे.पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शाळेतील उपक्रमशील शिक्षक डी.ए.सोनवणे यांनी राष्ट्रसंत जगनाडे महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रसंग आणि त्यावेळची असलेली शिक्षण प्रणाली याविषयी सांगतांना ते म्हणाले की, “देव अवतारापेक्षा संतांचा अवतार श्रेष्ठ आहे,

जगाच्या कल्याणा संतांची विभूती
देह कष्टविती परोपकारे ||
बुडत हे जनन देखवे डोळा
येतो कळवळा म्हणोनिया ||

आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची जननी आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यानुसार राष्ट्रसंत जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावड तालुक्यात सुदुंबरे या गावी ८ डिसेंबर १६२४ रोजी पांडुरंगजी जगनाडे यांच्या कुटुंबात झाला. त्याकाळात चाकण हे गांव चक्रवर्य राजाने स्थापन केले होते. या गावात किल्ला आहे. पंचक्रोशीत देहू, आळंदी, लोहगाव, इंदूरी, सुदुंबरे अशी गावे आहेत. राष्ट्रसंत जगनाडे महाराज यांचे जगनाडे हे टोपण आडनाव आहे. त्यांचे खरे आडनाव सोनवणे होते .

“उत्तम ते कूळ पावन तो देश,
तेथे हरीचे दास जन्म होती”

चाकण गावात चक्रधराचे देऊळ आहे. त्यामुळे त्यांचे नेहमी देवळात जाणे असायचे. भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, हरीचर्चा नेहमी होत असे. त्यामुळे भक्तीमार्गाचे बाळकडूच त्यांना लाभले होते. त्यावेळी शाळा नसल्यामुळे शिष्याला गुरूच्या घरी जाऊनच शिक्षण घ्यावे लागत असायचे. ते सर्वांशी प्रेमळ स्वभावाने वागत असत. त्याकाळात बालविवाह प्रथा असल्यामुळे जगनाडे महाराज यांचा वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षीच विवाह झाला. चक्रधर मंदिरात राष्ट्रसंत तुकोबाराय यांचे एकदा कीर्तन आयोजिले होते. त्यावेळी संत तुकोबारायांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य याविषयी जनजागृती केली. त्यावेळी राष्ट्रसंत जगनाडे महाराज यांच्या मनात विचार आला की,

“ज्याने गुरू नाही केला,
त्याचा जन्म वाया गेला

म्हणून आपण आजतागायत गुरू नाही केला याची खंत व्यक्त केली. त्यांनी संत तुकोबारायांना आपले गुरू केले. संत तुकोबा यांच्या १४ टाळकऱ्यांपैकी जगनाडे महाराज हे एक होते. अशी जगनाडे महाराजांच्या जीवनाविषयीची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.

याप्रसंगी शिक्षिका व्ही. डी. जाधव, पी. पी. पाटील, सी. डी. निकम, आर, एम. ताडे, बी. एस. चव्हाण, ए. यु. महाजन, एस. एस. तेले, शिक्षक आर. डी. महाजन, पी. ए. शेलकर, ए. पी. जाधव, पी. ठाकरे, व्ही. डी. पाटील, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशोक सैंदाने आणि शिवाजी पाटील यांनी सहकार्य केले.

Protected Content