चंदू अण्णा नगरातील रहिवासींचा महापौर, उपमहापौर यांना घेराव

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील चंदूअण्णा नगर परिसरात गेल्या २० वर्षांपासून गटारी नसल्यामुळे दुर्गंधी पसरून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आल्याने संतप्त झालेल्या नागरीकांनी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांना  घेराव घालत सात महिन्यांपुर्वी  दिलेल्या आश्वासना संदर्भात जाब विचारला.

सविस्तर माहिती अशी की, वार्ड क्रमांक ९ अर्थात चंदू अण्णानगर परिसरात गेल्या २० वर्षांपासून घरांची वस्ती आहे. हा भाग जळगाव महापालिकेच्या अंतर्गत असूनही अद्यापपर्यंत या परिसरात गटारी आणि रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान याच भागात मोठे भक्ती अपार्टमेंट मधील मलमुत्राचे पाणी व इतर सांडपाणी चंदूअण्णानगरात येते. दरम्यान येथे गटारी नसल्यामुळे हे सांडपाणी आणि इतर पाणी रस्त्यावर येवून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी होत आहे. आणि या दुर्गंधीतून परिसरात डेंग्यू व मलेरीया आजाराचे रूग्ण वाढलेले आहे. गेल्या २० वर्षांपासून वारंवार जळगाव महापालिकेला निवेदनही देण्यात आले. स्थानिक नगरसेवक लता भोईटे, डॉ. चंद्रशेखर अत्तरदे, मनोज चौधरी आणि प्रतिभा पाटील यांच्याकडे देखील याबाबत तक्रारी दिल्यात. परंतू आश्वासन देवून वेळ मारून नेण्यात आले आहे. यापुर्वी २० ऑगस्ट २०२१ रोजी देखील स्थानिक रहिवाशी यांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट देवून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. सात महिने होवूनही अद्यापपर्यंत या गटारीचे काम मार्गी लावले नाही.

दरम्यान, सोमवारी ११ एप्रिल रोजी महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील हे चंदूअण्णा नगरात एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आले असता स्थानिक रहिवाशांनी त्यांना घेराव घातला. गेल्या सात महिन्यापुर्वीचा दिलेल्या आश्वासनाचा जाब विचारला. महापालिकेत गटारीच्या कामासंदर्भात मागणी करण्यात आली असून लवकर काम पुर्ण होईल, असे महापौर जयश्री महाजन सांगून वेळ मारून नेली. दरम्यान, वेळोवळी गटारीचे कामांसदर्भात केवळ आश्वासन देत असल्याची संतप्त प्रतिक्रीया स्थानिक रहिवाश्यांकडून केली जात होती.  यावेळी स्थानिक रहिवाशी संजय बडगुजर, मनोज सोनवणे, लोकेश वाघ, अमित पाठक, राकेश सोनवणे, उमेश पाटील यांच्यासह चंदू अण्णा नगरातील स्थानिक रहिवाशी यांची मोठी गर्दी होती.

 

Protected Content