अमळनेर (प्रतिनिधी) येथील आदिवासी मुलांच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी उपविभागीय कार्यालय अमळनेर येथे विविध मागण्यांसाठी प्रा जयश्री दाभाडे आणि प्रा अर्जुन पावरा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. वस्तीगृहात विविध समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून अशा परिस्थितीतही त्यांना वेळेवर पूर्ण जेवण मिळत नाहीय. एवढेच नव्हे तर, शासकीय नियमानुसार सकाळचा नाश्ता,जेवण देखील मिळत नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या मांडताना सांगितलेले आहे की, वसतिगृहात जेवण अपूर्ण बनविले जाते. रोज 5 ते 6 विद्यार्थ्यांना जेवन कमी पडते. ठेकेदार कोण आहे?, हे गुप्त ठेवण्यात आले असून विद्यार्थी याबाबत अनभिज्ञ आहेत. गृहपाल हे अत्यंत अरेरावीची भाषा करतात. माझं काहीच कोणी करू शकत नाही कुठेही तक्रार करा, असे नेहमी म्हणत असतात. विद्यार्थ्यांसाठी असलेली शौचालये अत्यंत घाण असतात साफ सफाई केली जात नाही. अशा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शैक्षणिक नुकसान होत आहे. हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध भागांतून शिक्षणासाठी आपल्या आई वडील यांच्या पासून दूर येतात. परंतु त्यांना त्यांच्या मूलभूत शासनाने दिलेल्या सुविधा देखील वेळेवर व योग्य प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. आजही त्यांना त्या साठी रस्त्यावर उतरावं लागत ही या स्वतंत्र भारत देशाची शोकांतिका आहे. यावेळी आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्षा प्रा. जयश्री दाभाडे,अर्जुन पावरा,आप्पा दाभाडे, सुनील पावरा, रोहित पावरा, प्रशांत चव्हाण, निलेश पारधी,विक्की पारधी,दीपक पावरा, प्रताप पावरा, किरण गावित,कपिल पाडवी,रमेश वसावे,अश्विन देसाई आदी विद्यार्थी उपस्थित होते.