जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको भागामध्ये मंगळवार, १८ मार्च रोजी रात्री १० वाजता किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत लाकडे, दगड, विटा आणि कोयत्यांचा वापर करून एकमेकांना जखमी करण्यात आले. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिस सूत्रांनुसार, पिंप्राळा हुडको भागातील दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला. पहिल्या गटातील पूजा शशिकांत सावळे (वय-३५) यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की, संशयित आरोपी राहुल निकम, अनिता निकम, सोनाबाई रणशिंगे, ज्योती निकाळजे, गणेश निकाळजे, निखिल निकाळजे, विशाल निकाळजे, मुकेश निकाळजे आणि हिराबाई निकाळजे या नऊ जणांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना रस्त्यावर दगड, विटा फेकून मारहाण केली. यातील विशाल निकाळजे याने धारदार चाकूचा वापर करून पूजा सावळे यांच्या चेहऱ्यावर हल्ला केला आणि गंभीर जखमी केले. तसेच, त्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
दुसऱ्या गटातील निखिल गणेश निकाळजे (वय-१९) यांनीही फिर्यादीत नमूद केले आहे की, संशयित आरोपी किशोर लक्ष्मण सपकाळे, रोहित सपकाळे, दीपक सपकाळे, मिलिंद चित्ते आणि विकी सपकाळे यांनी त्यांना आणि त्यांच्या भावाला लाकडी दांडक्यांनी आणि कोयत्यांनी वार करून गंभीर दुखापत केली.
या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधात फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कालसिंग बारेला आणि चंद्रकांत पाटील हे करीत आहे.