जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा पंपीग जवळील गिरणा नदी काठच्या शेताच्या बंधारा कोरून वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणावर केलीजात आहे. या संदर्भात संबंधित शेतकरी बांधवांनी अनेकवेळा महसूल विभागाला तक्रारी देवूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या परिसरात पोलीस कर्मचारी व महसूल कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरापासून जवळ गिरणा नदी पात्र आहे. या नदीपात्रातून बेसुमार वाळूचा उपसा केला जात आहे. दरम्यान गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने गिरणा नदीला पाणी आले आहे. यामुळे वाळू वाहतूक करणाऱ्याची मोठ्या प्रमाणावर अडचण झाल्याने वाळू काढण्यासाठी आता नदीकाठच्या शेताचा बंधारा कोरून वाळू काढली जात आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे शेत हे धोक्यात आले आहे. वाळू वाहतूक करणाऱ्यांनी ठिकठिकाणी खड्डे करून वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. हा प्रकार रात्रीच्या वेळी अधिकप्रमाणावर होत आहे. दुसरीकडे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी या संदर्भात महसुल विभाग आणि पोलीस प्रशासनाला यावर कारवाई करण्याबाबत अनेकवेळा निवेदने व तक्रारी दिल्यात. परंतू प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही यांची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. वाळू वाहतूकदारांवर आळा घालण्यासाठी पोलीस कर्मचारी व महसूल कर्मचारी यांची गस्त वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.