Home धर्म-समाज पाल वृंदावन धाम आश्रमात संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी पुण्यतिथीनिमित्त महोत्सव

पाल वृंदावन धाम आश्रमात संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी पुण्यतिथीनिमित्त महोत्सव

0
108

सावदा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात असलेल्या श्री वृंदावन धाम पाल आश्रमात अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे आराध्य सद्गुरु, परम पूज्य ब्रह्मलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त दि. २४ व २५ डिसेंबर रोजी भव्य दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या प्रेरणेने या अध्यात्मिक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

या महोत्सवात परम पूज्य बापूजींचे गुरुवर्य संत श्री महादेव चैतन्य ऊर्फ दगडूजी बापू यांची जयंती तसेच पाल आश्रमात स्थित भव्य व दिव्य श्री हरिधाम मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचा संगम साधणाऱ्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांतून संत, महंत, महामंडलेश्वर आणि असंख्य भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ ते १० या वेळेत दीपोत्सव व भजन संध्याचे आयोजन करण्यात आले असून, दीपप्रज्वलन आणि भक्तिरसपूर्ण भजनांमधून संपूर्ण आश्रम परिसर उजळून निघणार आहे. या कार्यक्रमातून संत परंपरेचा वारसा आणि अध्यात्मिक साधनेचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.

दि. २५ डिसेंबर रोजी संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ६ ते ७ या वेळेत श्री हरिधाम मंदिरातील बापूजींच्या समाधी मंदिरात चरण पादुका पूजन व अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ७ ते ८ या वेळेत ध्यान व प्रार्थना होणार असून, भाविकांना आत्मिक शांतीचा अनुभव मिळणार आहे.

सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत उपस्थित संत, महंत व महामंडलेश्वरांचे श्रद्धावचन होणार असून, त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने पाल वृंदावन धाम आश्रम भक्ती, सेवा आणि समर्पणाचे केंद्र बनणार आहे.या दोन दिवसीय भव्य महोत्सवात सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound